प्रकाशने
प्रकाशनांचा तपशील
महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी: अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत सदर प्रकाशन 1978 पासून प्रकाशित करण्यात येत आहे. या छोटेखानी पुस्तिकेमध्ये (Pocket Book) राज्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या विकास क्षेत्रातील 24 निवडक आर्थिक बाबींची आकडेवारी तसेच दशवार्षिक तुलनात्मक माहिती प्रकाशित केली आहे.
महाराष्ट्राची संक्षिप्त सांख्यिकी: सन 1961 पासून प्रकशित होणाऱ्या या प्रकाशनात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व आर्थिक बाबींची संदर्भ वर्षाची संक्षिप्त माहिती सांख्यिकीय तक्त्यात (127 तक्ते) दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा: सदर प्रकाशन १९५१ पासून प्रकाशित करण्यात येत आहे. या प्रकाशनात लोकवित्त, राज्य उत्पन्न, गृहनिर्माण, शिक्षण व आरोग्य इ. आर्थिक व सामाजिक बाबींवरील जिल्हानिहाय तक्ते प्रकाशित करण्यात आले आहेत. या प्रकाशनात उपरोक्त विषयांवरील ३२ प्रकरणे असून एकूण 248 तक्ते समाविष्ट आहेत. सदर प्रकाशनाकरीता विविध विकास क्षेत्रांतर्गत अंदाजे 85 यंत्रणा व विविध संकेतस्थळे इ. स्त्रोतांकडून माहिती प्राप्त करण्यात येते.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशक: सदर प्रकाशनात महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे 138 निर्देशक व भारतातील राज्यांचे 134 निर्देशक प्रकाशित करण्यात आले आहेत. वर्ष 1982-83 पासून प्रकाशित होणाऱ्या या प्रकाशनात महाराष्ट्रातील जिल्हयांचे आणि भारतातील राज्यांचे मूलभूत सुविधा व सेवा विषयक बाबींचे निवडक निर्देशक विषयी आकडेवारी समाविष्ट आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यावरण सांख्यिकी: महाराष्ट्र राज्य पर्यावरण सांख्यिकी या प्रकाशनामध्ये पर्यावरणीय परिस्थिती आणि गुणवत्ता, पर्यावरण संसाधने आणि त्यांचा उपयोग, पर्यावरणीय अवशेष, आपत्ती व आपत्कालीन घटना, मानवी वसाहती आणि पर्यावरण आरोग्य व पर्यावरण संरक्षण, व्यवस्थापन आणि नियमन अश्या सहा विषयांवरील माहितीचा समावेश आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष: सन २०१५ पासून राज्य शासनामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी तयार केला जातो. या माहितीकोषात नियमित, नियमितेतर व तदर्थ कर्मचाऱ्यांची माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने संकलित केली जाते. माहिती अद्ययावत करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालयांमार्फत करण्यात येते. अहवालात जिल्हानिहाय मंजूर, भरलेली व रिक्त पदे, प्रशासकीय विभागनिहाय व स्वग्रामनिहाय माहिती तसेच वेतन व भत्त्यावरील खर्चाचा समावेश करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, खंड 1 ला, परि क्र. 139 नुसार अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ हे महत्वपूर्ण प्रकाशन दरवर्षी विधानमंडळास अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयातर्फे सादर करण्यात येते. या प्रकाशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये आणि विविध आर्थिक क्षेत्राबाबत समयसारणी स्वरुपात सांख्यिकीय आकडेवारी देण्यात येते.
तालुका निवडक निर्देशांक: तालुका निवडक निर्देशांक हे प्रकाशन जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत दर वर्षी प्रकाशित केले जाते. सदर प्रकाशनात जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या प्रकाशनावर आधारित महत्वाचे तालुकानिहाय निर्देशांकाची आकडेवारी प्रकाशित केली जाते. सदर प्रकाशनामध्ये जनगणना, आरोग्य, शिक्षण, कृषी, सहकार, पायाभूत सुविधा इत्यादी विषयक माहितीवर आधारित एकूण 49 निर्देशकांचा समावेश आहे.
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन: जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हे प्रकाशन दरवर्षी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत प्रकाशित केले जाते. जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रांची एकत्रित माहिती असणारे हे एकमेव प्रकाशन आहे. विविध प्रशासकीय विभागांना / कार्यालयांना नियोजन, संदर्भाकरिता जिल्हा स्तरावर आकडेवारी उपलब्ध होते. राज्याच्या विकासाचा जिल्हा हा केंदबिंदू असल्याने जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सदरची माहिती ही पायाभूत सांख्यिकी म्हणून वापरली जाते.
प्रकाशन शाखेमार्फत प्रकाशित करण्यात येणारी प्रकाशने